काश्मीरला भारतापासून वेगळं करणाऱ्यांशी चर्चा नाही
By Admin | Updated: April 28, 2017 19:19 IST2017-04-28T18:07:23+5:302017-04-28T19:19:53+5:30
काश्मीरमध्ये परिस्थिती वारंवार बिघडत चालली आहे. काश्मीरमध्ये आम्हाला शांतता हवी आहे. यासंबंधी राजकीय पक्षांशी चर्चा होऊ शकते. मात्र

काश्मीरला भारतापासून वेगळं करणाऱ्यांशी चर्चा नाही
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - काश्मीरमध्ये परिस्थिती वारंवार बिघडत चालली आहे. काश्मीरमध्ये आम्हाला शांतता हवी आहे. यासंबंधी राजकीय पक्षांशी चर्चा होऊ शकते. मात्र स्वातंत्र्य मागून काश्मीरला भारतापासून वेगळं मागणाऱ्या फुटीरतावाद्यांशी कोणतीच चर्चा होऊ शकत नाही असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. काश्मीरमधील पेलेट गनच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमुर्ती जे एस खेहर यांच्या खंडपीठासमोर झाली.
काश्मीरमधील पेलेट गनच्या वापरावर आम्ही बंदी घालण्याचा आदेश देतो, मात्र स्थानिकांकडून होणारी दगडफेक थांबेल असा विश्वास देऊ शकता का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं काश्मीर बार असोसिएशनसमोर उपस्थित केला. खंडपीठानं दगडफेक आणि स्थानिकांकडून होणाऱ्या उपद्रवावर सकारात्मक तोडगा कसा काढता येईल असा सवालही उपस्थित केला आहे. तसंच याचिकाकर्त्यांना सर्प पक्षांशी बातचित करुन परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल याचा विचार करण्यास सांगितलं आहे.
जमावाकडून होणारी जोरदार दगडफेक रोखण्यासाठीच पॅलेट गन्स चालवावी लागल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं. यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टीही केंद्राने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार आहे.