Siddaramaiah temple Visit:कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे. कोडागुच्या मंदिरात जाण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी मांसाहार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. आमदार बोपय्या यांनी आरोप केला की, सिद्धरामय्या यांनी मडिकेरी येथे मांसाहार केल्यानंतर कोडालीपेट येथील पवित्र बसवेश्वर मंदिरात गेले. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे हे कृत्य असल्याचे ते म्हणाले.
सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण18 ऑगस्ट रोजी कोडागुच्या दौऱ्यात कथितपणे मांसाहार केल्यानंतर सिद्धरामय्या कोडिलीपेट येथील बसवेश्वर मंदिरात गेल्याचा आरोप आहे. वाद वाढत असल्याचे पाहून सिद्धरामय्या यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ज्या दिवशी मंदिरात गेले, त्या दिवशी मांस खाल्ले नसल्याचे ते म्हणाले. मंगळवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'त्या दिवशी मांस खाल्ले नव्हते. या मुद्द्याला "नॉन-इश्यू" म्हणत सिद्धरामय्यांनी त्यांच्या आवडीचे जेवण खाण्याच्या अधिकारावर भर दिला.
मांस खाण्यात चुकी काय?'मांस खाणे हा इतका मोठा मुद्दा आहे का? काय खायचे, ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे. मी मांसाहार आणि शाकाहारी दोन्ही पदार्थ खातो. काही लोक मांस खात नाहीत, ही त्यांची खाण्याची सवय आहे. माझ्या मते हा इतका मोठा मुद्दा नाही. बरेच लोक मांसाहार न करता मंदिरात जातात आणि बरेच लोक मांस खाऊन मंदिरात जातात. अनेक ठिकाणी देवी-देवतांना मांस अर्पण केले जाते. पण, मी त्या दिवशी मांस खाल्ले नव्हते,' असंही ते म्हणाले.
...तर डुकराचे मांस खाऊन मशिदीत जा?'देवळात जाण्यापूर्वी काय खावे आणि काय खाऊ नये, असे देवाने सांगितले आहे का?' असा प्रश्न सिद्धरमय्यांनी उपस्थित केला होता. त्यावर, सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यांनी त्यांना आव्हान दिले की, 'सिद्धरामय्या, हिंमत असेल तर डुकराचे मांस खाऊन मशिदीत जाऊन दाखवा.' या आव्हानावर सिद्धरामय्या म्हणाले, 'मी फक्त चिकन आणि मटण खातो, इतर मांस खात नाही. पण मी ते खाणार्यांच्या विरोधात नाही, कारण ती त्यांची खाण्याची सवय आहे.'