कर्नाटकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान तरूणाचा खून कॅमे-यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2015 15:53 IST2015-09-26T15:51:18+5:302015-09-26T15:53:10+5:30
गणपती विसर्जनादरम्यान तलावात एका तरूणाचा खून झाल्याचे कॅमे-यात कैद झाले आहे.

कर्नाटकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान तरूणाचा खून कॅमे-यात कैद
>ऑनलाइन लोकमत
बंगळूर, दि. २६ - गणपती विसर्जनादरम्यान तलावात एका तरूणाचा खून झाल्याचे कॅमे-यात कैद झाले आहे. कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलमध्ये विसर्जनाचे शूटिंग करणा-या एका तरूणामुळे ही घटना उघडकीस आली आहे. मल्लिकार्जून असे त्या मृत तरूणाचे नाव असून तो तलावात बुडून अपघाताने त्याचा मृत्यू झाल्याचे आधी सर्वांना वाटले होते. मात्र तो बुडून नव्हे तर त्याला जाणूनबुजून बुडवून मारण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
एका खासगी कंपनीत काम करणारा मल्लिकार्जुन गणपती विसर्जनाच्या दिवशी मित्रांसोबत बाहेर पडला होता, मात्र त्याच्याऐवजी त्याचा मृतदेहच घरी आला. ज्या तलावात विसर्जन करण्यात येत होते, तेथे एक तरूण मोबाईलमधून शूटिंग करत होता. त्यात मल्लिकार्जुन बुडताना दिसत होता, मात्र बारकाईने पाहिल्यावर तो बुडत नसून तीन ते चार जण त्याला बुडवत होते, असे दिसून आले. व्हिडिओ शूटिंग करणा-याने हे फूटेज मल्लिकार्जुनच्या आईला दाखवले असता आपल्या मुलाचा खून झाल्याचे तिच्या लक्षात आले व तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी गुलबर्गा पोलिसांनी अज्ञात तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सखोल तपास करत आहेत. तसेच मल्लिकार्जुनच्या खूनाचा हेतूचा शोध घेण्यात येत आहे.