बंगळुरू - मला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. जवळपास ४८ नेत्यांची सीडी, पेनड्राइव्ह बनलेत. त्यात राज्यासोबत केंद्रातील मंत्र्याचाही समावेश आहे असा आरोप करत मंत्री केएन राजन्ना यांनी कर्नाटकात खळबळ उडवून दिली आहे. राजन्ना यांच्या मागणीनंतर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत.
मंत्री केएन राजन्ना म्हणाले की, अनेक राजकीय पक्षातील ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत. हे प्रकरण केवळ कर्नाटकपुरतं मर्यादित नाही. राष्ट्रीय पातळीवर हे पसरलं आहे. त्यात देशातील अनेक पक्षातील नेत्यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितले. मंत्री केएन राजन्न यांचा मुलगा आमदार राजेंद्र राजन्ना यांनीही या आरोपांवर पुष्टी दिली आहे. मागील ६ महिन्यापासून मला आणि माझ्या वडिलांसोबत हे सुरू आहे. आम्हाला वाटायचे हे सामान्य फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉल असतील. परंतु दिवसेंदिवस कॉल वाढत गेले. मी विधानसभेत हा मुद्दा उचलला आहे. गृहमंत्र्यांची चौकशीचे आदेश दिलेत असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला हे खरे आहे परंतु ते अयशस्वी ठरले. कर्नाटकात असं पहिल्यांदा होत नाही. मागील २० वर्षापासून होत आहे. काँग्रेस, भाजपा, जेडीएस प्रत्येक पक्ष याला बळी पडला आहे. या प्रकरणाची तक्रार नोंदवून चौकशी केली जावी. पीडितांना पुढे येऊन गुन्हे दाखल करावेत. त्यानंतर याची चौकशी करून सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी मंत्री सतीश जारकीहोली यांनी केली.