कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात सध्या खराब रस्त्यांच्या प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच खराब रस्त्यांच्या प्रश्नांवरून कर्नाटकमधीलकाँग्रेसच्या सरकारवरही टीका होत आहे. त्यातच आता बंगळुरूमधील रस्त्यांच्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना प्रश्न विचारला असता संतापलेल्या शिवकुमार यांनी खड्ड्यांवरून राज्य सरकारचा बचाव करताना केंद्र सरकारवर टीका केली.
शिवकुमार म्हणाले की, मी काल दिल्लीला गेलो होतो. तिथे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरही खड्डे आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरही खड्डे आहेत हे प्रसारमाध्यमांनी दाखवलं पाहिजे. खराब रस्ते ही संपूर्ण देशातील समस्या आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की, खड्डे प्रत्येक ठिकाणी आहेत, मात्र प्रसारमाध्यमांना केवळ कर्नाटकमधीलच खड्डे दिसतात, ही बाब काही योग्य नाही अशा शब्दात शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवकुमार यांनी पुढे सांगितले की, बंगळुरूबाबत अनावश्यक टीका केली जात आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर असलेल्या रस्त्यावरच १०० मीटरच्या अंतरावर ५० खड्डे आहेत. एवढंच नाही तर माझ्या दिल्लीतील सफदरजंग इन्क्लेव्ह येथील घरासमोरही खड्डे आहेत. मुंबई आणि देशातील कुठल्याही शहरामध्ये खड्ड्यांची समस्या आहे, मात्र केवळ बंगळुरूलाच का लक्ष्य केलं जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.