बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांना खास आवाहन केले आहे. सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून दिग्गज उद्योगपती अजीम प्रेमजी यांना शहरातील आउटर रिंग रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बंगळुरूतील त्यांच्या कंपनी परिसरातून मर्यादित वाहनांची वाहतुकीसाठी परवानगी मागितली आहे. १९ सप्टेंबरला सिद्धरामय्या यांनी हे पत्र पाठवले आहे.
या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने करत असलेल्या आढावा बैठकीत या पर्यायाने ODR च्या आसपासची वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी होऊ शकते असं बोलले जाते. विशेषत: ऑफिस पीक आवर्समध्ये कोंडी सुटू शकते. व्यस्त वेळेत होणारी वाहतूक व्यवस्था गतिशीलता, उत्पादकता आणि शहरी जीवनाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करते. विप्रोच्या पाठिंब्याचे महत्त्व सांगताना हा उपक्रम वाहतूक कोंडी कमी करण्यात, प्रवाशांचा अनुभव सुधारण्यात आणि अधिक कार्यक्षम बेंगळुरूमध्ये योगदान देण्यास खूप मदत करेल असं त्यांनी अजीम प्रेमजी यांनी म्हटलं. तुमची टीम आणि सरकारी अधिकारी यांच्या टीमने एकत्रितपणे यावर सहमती बनवून प्लॅनिंग करायला हवे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
रस्त्यावर खड्डे आणि कोंडीचा सामना
सरकारकडून हा प्रस्ताव आउटर रिंग रोडवर होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून प्रवाशांना होणारा त्रास आणि सामाजिक संघटनांकडून वारंवार व्यक्त होणाऱ्या चिंतेनंतर उचलण्यात आलेले पाऊल आहे. हा रोड शहरातील आयटी हबच्या दृष्टीने महत्त्वाचा कॉरिडोर आहे. अलीकडेच लॉजिस्टिक्स टेक्नोलॉजी फर्म ब्लॅकबक को फाऊंडरने शहरातील रस्त्यांची दुरावस्था, खड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याचे कारण देत बंगळुरूतील ऑफिस शिफ्ट करत असल्याचे म्हटले होते. सरकारकडून कुठलीही ठोस पाऊले उचलली जात नाही. कमीत कमी पुढचे ५ वर्ष ही स्थिती बदलण्याचीही शक्यता नाही अशी नाराजी ब्लॅकबकचे सीईओ राजेश याबाजी यांनी व्यक्त केली होती.
एका लॉजिस्टिक्स कंपनीने बंगळुरू सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटक सरकारवर टीका होऊ लागली. त्यातून केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. उद्योगपतींचा विश्वास संपुष्टात आला आहे. ते शेजारील राज्यात जाऊ लागलेत. सरकारने राज्याचा विकास वंचित ठेवत कन्नड लोकांच्या अस्मितेचा अपमान केला आहे असं त्यांनी म्हटलं. विरोधकांकडून होणारी टीका आणि नागरिकांमध्ये पसरत असलेला असंतोष यातून शहरातील वाहतूक कोंडीशी निगडित समस्या सोडवण्याचा दबाव निर्माण झाला. त्यातूनच मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांनी उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र लिहिले आहे.