बंगळुरू - कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगर विधानसभा क्षेत्रातील एका फ्लॅटमध्ये बनावट मतदार ओळखपत्र सापडल्यानं निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या जागेवार आता 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 8 मे रोजी आर.आर.नगर मतदारसंघाचील एका फ्लॅटमध्ये जवळपास 10,000 बनावट मतदार ओळखपत्रं सापडली होती. दरम्यान, हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते.
मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत, निवडणूक आयुक्त सुनील अरोडा आणि अशोक लवासा यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. 'आर.आर.नगर मतदारसंघात मतदारांना पैसे, महागड्या वस्तू आणि अन्य वस्तूंचं वाटप करण्यात आल्याची तक्रार मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी मतदारांना प्रलोभन देणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यासही सुरुवात केली.'
यातील दोन घटना गंभीर असल्याचे सांगत निवडणूक आयोगानं या जागेवरील मतदानाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 6 मे रोजी एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात सामान जप्त करण्यात आले. या सामानाची किंमत जवळपास 95 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. तर याच विधानसभा क्षेत्राच्या जलहल्ली परिसरात छापेमारीदरम्यान एका फ्लॅटमध्ये बोगस मतदार ओळखपत्रं आढळून आली.