कर्नाटकातील हासनमध्ये हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या ४० दिवसांत येथे हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा जण १९ ते २५ वयोगटातील होते. तर आठ जण हे २५ ते ४५ वयोगटातील होते. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी तपासणीसाठी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
बंगळुरूच्या जयदेव रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या ८ टक्क्यांनी वाढली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, वाढत्या प्रकरणांमध्ये, हासन आणि जवळच्या जिल्ह्यांमधून अनेक लोक खबरदारी म्हणून तपासणीसाठी येत आहेत. दररोज हजारो लोक हृदयाशी संबंधित तपासणीसाठी म्हैसूरच्या जयदेव रुग्णालयात पोहोचत आहेत. यामुळे रुग्णालयात प्रचंड गर्दी आहे.
जयदेव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के.एस. सदानंद यांनी लोकांना घाबरू नका असं आवाहन केलं माध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर लोक घाबरून रुग्णालयाकडे धावत आहेत. जयदेव रुग्णालयात एकदा तपासणी करून समस्या सुटणार नाही असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
लोकांनी त्यांच्या जवळच्या कोणत्याही रुग्णालयात त्यांच्या हृदयाची तपासणी करून घ्यावी. केवळ हृदय तपासणी करून भविष्यातील समस्या टाळता येणार नाहीत. जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत. चांगले आरोग्य राहण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम देखील आवश्यक आहे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी तब्बल ६ कोटी लोकांचा मृत्यू होतो. यापैकी सुमारे ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. जगात सर्वाधिक मृत्यू या आजारामुळे होतात. दरवर्षी १.७५ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या हृदयाशी संबंधित आजारामुळे आपला जीव गमावत आहेत.
पूर्वी हृदयासंबंधित आजाराचे बहुतेक रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. आता नवीन समस्या अशी आहे की, गेल्या काही वर्षांत, ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक देखील त्याचे बळी ठरत आहेत. कोरोना व्हायरसनंतर हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.