कन्हैया, उमर आणि अर्निबनला जेएनयूमधून काढून टाका - चौकशी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 09:48 IST2016-03-15T09:21:18+5:302016-03-15T09:48:49+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने पाच विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली आहे.

कन्हैया, उमर आणि अर्निबनला जेएनयूमधून काढून टाका - चौकशी समिती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने पाच विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली आहे. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार, पीएचडीचा अभ्यास करणारा उमर खालिद आणि अर्निबन भट्टाचार्यचा समावेश आहे.
देशद्रोहाच्या आरोपाखाली सध्या उमर आणि अर्निबन न्यायालयीन कोठडीत आहेत तर, कन्हैया हंगामी जामिनावर बाहेर आहे. नऊ फेब्रुवारीला कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमात देश विरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या त्याच्या चौकशीसाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.
आणखी चार विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि काही विद्यार्थ्यांना दंड आकारुन सोडले जाऊ शकते. एकूण २१ विद्यार्थ्यांना तुमच्यावर कारवाई का करु नये ? म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊ शकते.
चौकशी समितीला विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हे विद्यार्थी दोषी आढळले आहेत. डीनच्या कमिटी मिटींगला उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढले जाऊ शकते. चौघांवर निलंबनाची कारवाई होईल. पण त्यांना वसतिगृह सोडण्यास सांगण्यात येऊ शकते.
अहवालात अनेक शिफारसी करण्यात आल्या आहेत पण शिक्षेसंबंधी अंतिम निर्णय व्हाईस चांसलर घेणार असून, विद्यार्थी कारणे दाखवा नोटीसला काय प्रतिसाद देतात त्यावरही शिक्षेचे प्रमाण अवलंबून असेल असे सूत्रांनी सांगितले.