कच्चतीवू बेटासाठी श्रीलंकेशी युध्द करावे लागेल - अॅटर्नी जनरल
By Admin | Updated: August 27, 2014 13:43 IST2014-08-27T13:35:59+5:302014-08-27T13:43:41+5:30
श्रीलंकेला दिलेले कच्चतीवू बेट परत घेणे जवळपास अशक्य असून हे बेट परत घेण्यासाठी श्रीलंकेसोबत युद्ध करावे लागेल असे मत अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे.

कच्चतीवू बेटासाठी श्रीलंकेशी युध्द करावे लागेल - अॅटर्नी जनरल
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - श्रीलंकेला दिलेले कच्चतीवू बेट परत घेणे जवळपास अशक्य असून हे बेट परत घेण्यासाठी श्रीलंकेसोबत युद्ध करावे लागेल असे मत अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे.
१९७४ मध्ये श्रीलंकेसोबतच्या करारात भारताने कच्चतीवू हा बेट श्रीलंकेला दिला होता. हे बेट भारताने परत घ्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असून तामिळनाडूतील नेत्यांनी यासंदर्भात मोदींना पत्रही पाठवले होते. तामिळनाडूतील खासदारांनी श्रीलंकेच्या अटकेत असलेल्या भारतीय मच्छिमारांच्या सुटकेसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर अॅटर्नी जनरल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टासमोर हे मत मांडले. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या खंडपीठाने या मतावर भाष्य केले. 'सुप्रीम कोर्ट हे युद्धासाठी नसून शांततापूर्ण चर्चेसाठी आहे असे या खंडपीठाने सांगितले. भारत आणि श्रीलंकेमधील विषयावर सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही. याचिकाकर्ते हे स्वतः खासदार असल्याने त्यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करावा असे सुप्रीम कोर्टाने सुनावले.