ज्योती मुद्यावरील कोंडी फुटली
By Admin | Updated: December 9, 2014 01:47 IST2014-12-09T01:47:05+5:302014-12-09T01:47:05+5:30
सर्वप्रथम विरोधकांनी या मुद्यावर साध्वींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर काहीशी मवाळ भूमिका घेत, राज्यसभेत असा प्रस्ताव आणण्याची मागणी विरोधकांनी केली होती़

ज्योती मुद्यावरील कोंडी फुटली
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्यावरील संसदेतील आठवडाभरापासूनची कोंडी सोमवारी फुटली़ संसदेच्या सर्व सदस्यांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सार्वजनिक विधाने करताना कुठल्याही स्थितीत संयम बाळगावा, अशा आशयाच्या राज्यसभा सभापतींच्या प्रस्तावानंतर या मुद्यावरील पेचप्रसंग संपला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज सुरळीत सुरू झाल़े
सर्वप्रथम विरोधकांनी या मुद्यावर साध्वींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर काहीशी मवाळ भूमिका घेत, राज्यसभेत असा प्रस्ताव आणण्याची मागणी विरोधकांनी केली होती़
सभापती मोहंमद हमीद अन्सारी यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांच्या सहमतीने आलेला हा प्रस्ताव राज्यसभेत वाचून दाखवला़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबरला सभागृहात दिलेले स्पष्टीकरण ध्यानात घेत, सर्व खासदार, मंत्री आणि नेत्यांनी सार्वजनिक विधाने करताना, संयम आणि शिष्टाचार पाळावा़ कुठल्याही स्थितीत सार्वजनिक विधाने करताना शिष्टाचार पाळला जायला हवा, असे या प्रस्तावात म्हटले आह़े या प्रस्तावानंतर राज्यसभेतील कोंडी फुटली आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाल़े
लोकसभेत काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, सपा, राजद आणि अन्य पक्षांनी कामकाजात भाग घेतला़ सरकारनेही सभागृहाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल विरोधकांचे आभार मानल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)