लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: नवे सरन्यायाधीश बी. आर. गवई सर्वोच्च न्यायालयाची मूल्ये, मूलभूत अधिकार व घटनात्मक तत्त्वांची जपणूक करतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केले. मंगळवारी न्या. खन्ना निवृत्त झाले तेव्हा न्यायालयातील आपल्या सहकाऱ्यांना निरोप देताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनीही सेवानिवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकार न करण्याचे संकेत दिले.
निरोपाशी निगडित या पीठात मावळते सरन्यायाधीश स्वतः खन्ना, न्या. गवई व न्या. संजय कुमार यांचा समावेश होता. खंडपीठाने केवळ या न्यायपालिकेसाठी दिलेल्या योगदानाबद्दलच नाही तर त्यांचे काका व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. एच. आर. खन्ना यांचा वारसा पुढे नेल्याबद्दल खन्ना यांची प्रशंसा केली.
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त करताना न्यायव्यवस्थेसोबतच्या अनेक वर्षाच्या आठवणींना उजाळा देताना, मी भारावून गेलो, असे म्हणत तुमच्यासोबतच्या आठवणी खूप चांगल्या असून, त्या आयुष्यभर सोबत राहतील, असे ते म्हणाले.
मध्यस्थतेच्या क्षेत्रात नवीन काम सुरू करू शकतो
पीठाची औपचारिक कारवाई समाप्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सांगितले की, सेवानिवृत्तीनंतर मध्यस्थतेच्या क्षेत्रात नवीन काम सुरू करू शकतो. मी तिसरी इनिंग खेळणार आहे व कायद्याशी संबंधित काही करू इच्छित आहे. आम्ही सकारात्मक व नकारात्मक मुद्दे पाहतो व नंतर निर्णय घेतो. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी साहाय्यकारी ठरणाऱ्या तर्कसंगत विविध कारकांवर विचार करतो, असे ते म्हणाले.