लाचखोर तलाठ्यास न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: May 18, 2014 21:28 IST2014-05-18T19:57:12+5:302014-05-18T21:28:10+5:30
पिंजर महसूल मंडळातील लाचखोर तलाठ्यास न्यायालयीन कोठडी.

लाचखोर तलाठ्यास न्यायालयीन कोठडी
पिंजर(अकोला): लाचखोरी प्रकरणात अडकल्यानंतर फरार झालेला पिंजर महसूल मंडळातील तलाठी दर्शन चव्हाण याने मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागासमोर शरणागती पत्करली. एसीबीने त्याला न्यायालयासमक्ष सादर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. आम आदमी पॉलिसीचे पैसे व बहिणीच्या नावे शेतीची हक्क नोंदणी करण्यासाठी पिंजर मंडळातील तलाठी दर्शन चव्हाण याने ४ एप्रिलला बार्शीटाकळी तहसील कार्यालयात कानडी बाजार येथील प्रवीण खरबडकार या शेतकर्याकडून १३ हजार रुपयांची लाच घेण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला पकडण्यासाठी सापळा रचल्याची कुणकुण लागल्यानंतर दर्शन चव्हाण याने तहसील कार्यालयातून पळ काढला व तेव्हापासून तो फरारच होता. या दरम्यान त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला. अखेर मंगळवार, १३ मे रोजी चव्हाण एसीबी समोर शरण आला. एसीबीच्या अधिकार्यांनी त्याला न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.