पत्रकार प्रफुल्ल बिडवई यांचे हॉलंडमध्ये निधन
By Admin | Updated: June 25, 2015 00:04 IST2015-06-25T00:04:47+5:302015-06-25T00:04:47+5:30
ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अणु प्रकल्पविरोधी कार्यकर्ते प्रफुल्ल बिडवई यांचे हॉलंड दौऱ्यावेळी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

पत्रकार प्रफुल्ल बिडवई यांचे हॉलंडमध्ये निधन
लंडन : ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अणु प्रकल्पविरोधी कार्यकर्ते प्रफुल्ल बिडवई यांचे हॉलंड दौऱ्यावेळी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
दिल्ली येथील रहिवासी असलेले बिडवई मंगळवारी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी अॅमस्टरडॅम येथे आले होते. भोजनवेळी अन्नाचा तुकडा घशात अडकला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘द वायर’ या संकेतस्थळाला त्यांच्या परिवाराशी संबंधित व्यक्तीने ही माहिती दिली. दरम्यान, हॉलंडमधील भारतीय दूतावासाने आपल्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर येथे जन्मलेल्या प्रफुल्ल बिडवई यांनी भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद, केंद्रीय शिक्षण सल्लागार समिती आणि नॅशनल बुक ट्रस्ट यासारख्या नामवंत संस्थांचे सदस्य म्हणून काम केले आहे.
राजकीय अर्थशास्त्र, शाश्वत विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, अणू, पर्यावरण, जागतिक न्याय आणि शांतता हे त्यांच्या लिखाणाचे प्रमुख विषय होते. (वृत्तसंस्था)