JNU Violence: जेएनयूमधील हिंसाचार पूर्वनियोजित?; व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवरील 'त्या' मेसेजमुळे संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 08:11 AM2020-01-06T08:11:36+5:302020-01-06T08:39:23+5:30

हिंसाचाराआधी अनेक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्समध्ये चिथावणीखोर मेसेज

JNU violence chats in WhatsApp groups suggests planning | JNU Violence: जेएनयूमधील हिंसाचार पूर्वनियोजित?; व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवरील 'त्या' मेसेजमुळे संशय बळावला

JNU Violence: जेएनयूमधील हिंसाचार पूर्वनियोजित?; व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवरील 'त्या' मेसेजमुळे संशय बळावला

googlenewsNext

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराआधी 'देशद्रोह्यांना झोडून काढा', असे मेसेज काही व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होते. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी 'द इंडियन एक्स्प्रेस'नं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हिंसाचारासाठी चिथावणी देणारे मेसेज करणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकांशी संपर्क साधून हे वृत्त देण्यात आलं आहे. 

हिंसाचाराचं आवाहन करणाऱ्या सहापैकी तीन जणांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांचा गैरवापर झाल्याचा दावा केला. आपल्या मित्रानं 'तो' मेसेज केल्याचं एकानं म्हटलं. तर दुसऱ्यानं आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य असल्याचं सांगितलं. 'एकदा आरपार करण्याची गरज आहे. त्यांना आता मारणार नाही, तर कधी मारणार,' असा मेसेज या विद्यार्थ्यानं केला होता. याबद्दल विचारणा केल्यावर मी जेएनयूचा विद्यार्थी असून पीएचडी करत आहे. होय, मी एबीव्हीपीचा सदस्य आहे. पत्रकार जेएनयूची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्यानं सांगितलं. मात्र काही तासांनंतर मी जेएनयूचा विद्यार्थी आहे. पण तो मेसेज मी केला नाही. कोणीतरी माझ्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर केल्याचा दावा त्यानं केला. 

'लेफ्ट टेरर डाऊन डाऊन' नावाच्या एका व्हॉट्स अ‍ॅपवर ग्रुपवर एकानं 'आम्हाला जेएनयूमध्ये खूप मजा आली. त्या देशद्रोह्यांना मारुन आनंद झाला,' असा मेसेज केला होता. त्याच्याशी संपर्क साधला असता, 'मी हरयाणाचा असून महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. आम्ही काही जण मस्करी करत होतो. त्यावेळी जेएनयूमधील डाव्यांच्या दहशतीची माहिती आमच्या वाचनात आली. त्यावेळी माझ्या मित्रानं माझा फोन घेतला आणि व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप जॉईन करुन मेसेज तो मेसेज पोस्ट केला. त्यावेळी मी त्याला फटकारलं होतं. मी राजकीयदृष्ट्या फारसा जागरुक नाही. त्यामुळे जेएनयूचे विद्यार्थी देशद्रोही आहेत की नाही, याची कल्पना नाही,' अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यानं केला. 

त्यांना वसतिगृहात घुसून मारू, असा मेसेज करणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला असता, आपण नोएडामध्ये वास्तव्यास असल्याचं त्यानं सांगितलं. तुम्हाला माझा नंबर कोणी दिला, अशी विचारणा करत त्यानं फोन कट केला. 'युनिटी अगेन्स्ट लेफ्ट' नावाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सदस्य असलेल्या एकानं कॅम्पसमधील हिंसाचार संपवण्यासाठी ग्रुपमध्ये सहभागी झाल्याचं सांगितलं. 

'मी सध्या एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आहे. मी जेएनयूचा विद्यार्थी नाही. पण मी माझ्या कॉमरेड्ससोबत आहे. त्या ग्रुपमध्ये चालणाऱ्या संवादांवरुन मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्यांनी मला ग्रुपमधून काढलं. त्या ग्रुपची लिंक कोणीतरी मला पाठवली होती,' असं या व्यक्तीनं सांगितलं. मात्र एबीव्हीपीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यानं केला. 

'युनिटी अगेन्स्ट लेफ्ट' व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील एकानं ग्रुपचं नाव बदलून 'संघी गुन्स मुर्दाबाद' असं केलं. त्यानंतर त्यानं हा ग्रुप सोडला. त्याच्याशी संपर्क साधला असता, आपण केरळचे असून कोणीतरी मला त्या ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं होतं, असं त्यानं सांगितलं. मी एबीव्हीपीच्या विरोधात आहे. माझा हिंसाचाराशी संबंध नाही. मी तर त्या ग्रुपचं नावदेखील बदललं होतं, असं तो म्हणाला. 
 

Web Title: JNU violence chats in WhatsApp groups suggests planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.