राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:17 IST2018-06-20T18:14:32+5:302018-06-20T18:17:55+5:30
काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख
नवी दिल्ली: काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी येथील लष्करी कारवायांमध्ये कोणताही फरक पडणार नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आली तरी लष्कराला कोणताही फरक पडेल, असे मला वाटत नाही. आमच्या कारवायांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील लष्करी कारवाया पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. तसेच केंद्र सरकारने रमझानमध्ये शस्त्रसंधी केल्यामुळेच लोकांना शांततापूर्ण वातावरणात नमाज अदा करता आली. मात्र, ही शस्त्रसंधी अधिक काळ सुरु राहिली असती तर दहशतवाद्यांच्या कारवायांनी वेग आला असता. त्यामुळे रमजाननंतर शस्त्रसंधी मागे घेण्यात आली, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.
काश्मीरमध्ये भाजपाने नुकताच पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. रमजानच्या काळातील शस्त्रसंधीचा मुद्दा युती तुटण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक होता. मात्र, पीडीपीने शस्त्रसंधीची ही मुदत आणखी काही काळ वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाने या मागणीला केराची टोपली दाखवत लष्कराला काश्मीरमध्ये पुन्हा फ्री हँड दिला होता.