निर्भया प्रकरणातील अल्पवयीन नराधमाला 'जिहाद'चे धडे ?
By Admin | Updated: October 1, 2015 13:57 IST2015-10-01T11:51:28+5:302015-10-01T13:57:11+5:30
- दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन नराधमाला बालसुधार गृहात 'जिहाद'चे धडे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

निर्भया प्रकरणातील अल्पवयीन नराधमाला 'जिहाद'चे धडे ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन नराधमाला बालसुधार गृहात 'जिहाद'चे धडे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटाप्रकरणी बालसुधार गृहात असलेल्या एका आरोपीसोबत निर्भयातील नराधमाची मैत्री वाढली असून गुप्तचर यंत्रणांच्या इशा-यानंतर दोघांनाही आता एकमेकांपासून लांब ठेवण्यात आले आहे.
दिल्लीत २०१३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी जम्मूत राहणा-या एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. सध्या हा आरोपी दिल्लीतील बालसुधार गृहात आहे. तर २०१२ मधील निर्भयाप्रकरणातील अल्पवयीन नराधमही सध्या याच सुधारगृहात आहे. गुन्हा घडला त्यावेळी दोघेही अल्पवयीन असले तरी सध्या त्यांचे वय २० वर्ष आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमधील मैत्री वाढली होती. दोघेही बराच वेळ एकमेकांसोबत असायचे. बॉम्बस्फोटीतील आरोपी निर्भय प्रकरणातील आरोपीला 'जिहाद'चे धडे देत असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यानेही जिहादच्या लढाईत सामील व्हावे यासाठी त्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. या इशा-यानंतर बालसुधार गृहाने दोघांनागी वेगवेगळ्या खोलीत ठेवले असले तरी सुधारगृहातील अधिका-यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.