झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या राज्यसभेच्या खासदार महुआ मांझी या एका अपघातात जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मांझी महाकुंभावरून परतत होत्या. लातेहारच्या होटवाग गावात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये गाडीच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आणि महुआ मांझी गंभीर जखमी झाल्या. बुधवारी पहाटे ४ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३९ वर ही घटना घडली.
महुआ मांझी यांचा मुलगा सोमवित मांझी म्हणाले की, "आम्ही प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यावरून परतत असताना हा अपघात झाला. माझी आई आणि पत्नी मागच्या सीटवर होत्या. मी गाडी चालवत होतो आणि ३:४५ च्या सुमारास माझा डोळा लागला, झोप आली आणि गाडी कुठेतरी धडकली. गाडीत धूर झाला होता आणि आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो."
"मी माझ्या आईला गाडीतून बाहेर काढलं आणि तिचं मनगट तुटलं होतं आणि तिच्या हातातून रक्त येत होतं. आईच्या छातीत आणि हातात खूप वेदना होत होत्या. आम्ही तिला लातेहार येथील रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आम्ही तिला रांचीला घेऊन गेलो."
"डॉक्टरांनी सांगितलं की, आईचा डावा हात तुटला आहे आणि तिच्या बरगड्यांना देखील दुखापत झाली आहे. तिच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागेल. तिच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत."
प्राथमिक उपचारांसाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर चांगल्या उपचारांसाठी रांची रिम्स येथे रेफर करण्यात आले. महुआ मांझी या मोठ्या हिंदी लेखिकांपैकी एक आहेत आणि समाजसेवेच्या क्षेत्रात त्याचं नाव प्रसिद्ध आहे. त्या हेमंत सोरेन यांच्या कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जातात आणि बऱ्याच काळापासून त्या जेएमएम महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.