झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे आधी पाच अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यापैकी तीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी सामुहिक बलात्कार केला. यादरम्यान,दोन मुली आरोपींच्या तावडीतून पळ काढण्यात यशस्वी ठरल्या. त्यांनी गावामध्ये जाऊन लोकांना त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकार सांगितला. त्यानंतर या गावकऱ्यांनी पीडित मुलींसह पोलिसांत धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.
याबत खुंटीचे एसपी अमन कुमार यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. येतील पाच मुली ह्या रनिया परिसरात एका विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर घरी परतत होत्या. दरम्यान, काही मुलांनी त्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी त्यांनी त्या मुलींना पकडून त्यांचं अपहरण केलं. तसेच जवळच्या डोंगरावर घेऊन गेले. यादरम्यान, दोन तरुणींनी आरोपींच्या हातांचा चावा घेतला आणि तिथून पळ काढला.
त्यानंतर या १८ जणांनी तीन मुलींवर सामुहिक बलात्कार केला. तसेच त्यांना जंगलात सोडून फरार झाले. आरोपींच्या तावडीतून सुटलेल्या मुली जेव्हा गावात पोहोचल्या तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या भयावह घटनेची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पीडित मुलींना सोबत नेले. या पाच मुलींपैकी तिघींचं वय हे १२ ते १६ दरम्यान आहे. तर आरोपींचं वयही १२ ते १७ दरम्यान, असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित तरुणींनी दिलेल्या तक्रारींच्या आधारावर आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या एका पथकाने सर्व आरोपींना अटक केली असून, त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.