जयपूर : संपांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ज्वेलर्सनी सराफा क्षेत्रामधील भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी केले. जयपूर येथे इंडिया जेम अँड ज्वेलरी पुरस्कारांच्या वितरण समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून गोयल बोलत होते.पीयूष गोयल पुढे म्हणाले, ‘यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लागू करण्यात आलेला १ टक्का अबकारी रद्द करावा, यासाठी ज्वेलर्स मागणी करत आहेत, पण या कराचा उद्देश महसुलात वाढ करणे हा नसून, व्यवस्था अधिक स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.’ या वेळेस बोलताना जीजेपीईसीचे अध्यक्ष प्रवीणशंकर पंड्या म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांच्या काळांमध्ये अडथळ्यांचा सामना करत, भारतीय सराफा उद्योगाने प्रचंड लवचीकपणा दाखवून दिला आहे. याच खडतर काळामध्ये सराफा क्षेत्राने केलेली प्रगती तितकीच आनंददायी आहे. कंपन्यांनी केलेल्या प्रगतीमुळे सराफा उद्योगाची निर्यात ४० अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली आहे. या प्रगतीमध्ये सहभागी असणाऱ्यांचा जीजेपीईसीने सन्मान केला आहे.’ द जेम अॅण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट कौन्सिल (जीजेइपीसी)ने या पुरस्कारांचे आयोजन केले होते. भारतीय सराफा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना या वेळेस सन्मानित करण्यात आले. या वर्षी ३२ पुरस्कार देण्यात आले व पाच सत्कार करण्यात आले. (वृत्तसंस्था)
ज्वेलर्सनी सराफा क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्याचे ध्येय ठेवावे
By admin | Updated: March 14, 2016 02:32 IST