जीतन राम मांझी बिहारचे नवे मुख्यमंत्री
By Admin | Updated: May 20, 2014 03:13 IST2014-05-20T03:13:50+5:302014-05-20T03:13:50+5:30
नितीशकुमार यांनी आपला राजीनामा मागे घेण्यास नकार दिल्यानंतर बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून जीतन राम मांझी यांची निवड करण्यात आली आहे़

जीतन राम मांझी बिहारचे नवे मुख्यमंत्री
पाटणा : जनता दल (युनायटेड) अर्थात जदयू आमदारांच्या अनेक आग्रहानंतरही नितीशकुमार यांनी आपला राजीनामा मागे घेण्यास नकार दिल्यानंतर बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून जीतन राम मांझी यांची निवड करण्यात आली आहे़ नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात अनुसूचित जाती-जमाती कल्याणमंत्री राहिलेले मांझी राज्यातील दलित चेहरा आहे़ नितीशकुमारांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात़ मांझी यांनी सोमवारी जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव, मावळते मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंह यांच्यासह राज्यपाल डी़ वाय. पाटील यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केला़ जदयूचे ११७ आमदार आणि दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र या वेळी त्यांनी सादर केले़ राज्यपालांना भेटण्यापूर्वी जदयू विधिमंडळ दलाची बैठक पार पडली़ या बैठकीत नितीशकुमारांना राजीनामा मागे घेण्याची गळ घातली गेली़ मात्र नितीशकुमारांनी तो मागे घेण्यास नकार दिल्यावर नवा मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार त्यांच्याकडे सोपविण्यात आले़ त्यानुसार मांझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले़ २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेने कौल दिला तर पुन्हा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असे नितीशकुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले़ लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आपल्या समर्थकांना संबोधित करीत होते़ जदयू विधिमंडळ पक्षाने मला नवा मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार दिले आहेत़ मी भावनेच्या भरात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला नाही़ हा निर्णय घेण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांसोबतही मी चर्चा केली होती़ हा एक कठीण राजकीय निर्णय होता़, असेही नितीश म्हणाले़ (वृत्तसंस्था)