आधी जशोदाबेन यांची घरवापसी करावी - गुरूदास कामत
By Admin | Updated: January 28, 2015 18:44 IST2015-01-27T17:29:54+5:302015-01-28T18:44:54+5:30
'घरवापसी करायची असेल तर आधी जशोदाबेन यांची घरवापसी करावी' अशा शब्दांत काँग्रेस नेते गुरदास कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे.

आधी जशोदाबेन यांची घरवापसी करावी - गुरूदास कामत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या 'घरवापसी'च्या विषयावरन पुन्हा एकदा रण माजले आहे. 'घरवापसी करायची असेल तर आधी जशोदाबेन यांची घरवापसी करावी' अशा शब्दांत काँग्रेस नेते गुरदास कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. मोदींना स्वत:च्या पत्नीचा विसर पडला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मनपा आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंबईतील आजाद मैदानात काँग्रेसने आज भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी ते बोलत होते. मोदींचे बेटी बचाओ आंदोलन म्हणजे निव्वळ भंपकपणा असल्याचे ते म्हणाले. महिला सबलीकरणाविषयी बोलणा-या पंतप्रधानांनी स्वत:च्या पत्नीला सोडून दिले, स्मृती इराणींना मात्र कॅबिनेट मंत्रीपद दिले असे सागंत कामत यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा नारा देणारे पंतप्रधान मोदी स्वत:च्या पत्नीचा स्वीकार का करत नाही?असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच महापालिका, राज्य व केंद्र सरकारवरही त्यांनी टीकेची झोड उठवली. मालमत्ता कर, बेस्ट दरवाढ कमी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सत्ता गेल्यामुळे काँग्रेस नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. गुरूदास कामत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. वैयक्तिक चिखलफेक करण्याचे काम कामत व त्यांचा पक्ष सातत्याने करत असल्याचे सांगत भाजपाने कामतांच्या या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.