जशोदाबेन मोदींना पासपोर्ट नाकारला
By Admin | Updated: November 8, 2015 00:19 IST2015-11-08T00:19:22+5:302015-11-08T00:19:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी पासपोर्टसाठी केलेला अर्ज ‘अपूर्ण’ असल्याचे कारण देत, येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने त्यांना परत केला आहे.

जशोदाबेन मोदींना पासपोर्ट नाकारला
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी पासपोर्टसाठी केलेला अर्ज ‘अपूर्ण’ असल्याचे कारण देत, येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने त्यांना परत केला आहे.
क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी झेड. ए. खान यांनी सांगितले की, ‘जशोदाबेन यांनी पासपोर्टसाठी केलेल्या अर्जासोबत विवाहाचे प्रमाणपत्र किंवा पतीसह केलेले संयुक्त प्रतिज्ञापत्र न दिल्याने त्यांचा अर्ज परत करण्यात आला. विवाह दाखला किंवा संयुक्त प्रतिज्ञापत्र पासपोर्टसाठी आवश्यक असते.’
मित्रमंडळी व नातेवाईकांना भेटायला परदेशात जाण्यासाठी श्रीमती मोदी यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. जशोदाबेन यांचे बंधू अशोक मोदी यांनी सांगितले की, ‘आमचे अनेक कौटुंबिक मित्र परदेशात आहेत. जशोदाबेननी भेटायला तिकडे यावे, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून त्यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला होता, पण तो नाकारण्यात आला आहे. पासपोर्ट मिळविणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे आता कदाचित जशोदाबेन यांना पासपोर्टसाठी अन्य कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल,’ असेही अशोक मोदी यांचे म्हणणे होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात नरेंद्र मोदी यांनी जशोदाबेन या आपल्या पत्नी असल्याचे प्रथमच उघड केले होते.