जमशेदजी टाटांवरील नाण्याचे आज अनावरण
By Admin | Updated: January 6, 2015 01:47 IST2015-01-06T01:47:44+5:302015-01-06T01:47:44+5:30
सरकार लवकरच टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त आज नाणे जारी करणार आहे.

जमशेदजी टाटांवरील नाण्याचे आज अनावरण
नवी दिल्ली : सरकार लवकरच टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त आज नाणे जारी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पंतप्रधानांच्या घरातील एका छोटेखानी समारंभात १०० व पाच रुपयांच्या नाण्याचे मंगळवारी अनावरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जमशेदजी टाटा यांना आधुनिक भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते. केंद्र सरकारकडून अशा प्रकारचा सन्मान दिले जाणारे ते पहिले उद्योगपती ठरतील. यापूर्वी, सरकारने १९५८ आणि त्यानंतर १९६५ साली जमशेदजी यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट प्रसिद्ध केले होते.
अधिकाऱ्याने सांगितले की, टाटा हे एक ख्यातनाम व्यक्ती होते आणि सरकारचा या निर्णयाद्वारे भारतीय उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. याचमुळे जमशेदजी टाटा यांना सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान, सरकार आतापर्यंत कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, शास्त्रज्ञ, संस्था व संघटना यांच्या सन्मानार्थ नाणे जारी करत असे. (लोकमत न्यूज नेटवर्क)