जम्मूत १२ तासांमध्ये तीन दहशतवादी हल्ले, सात जवान शहीद
By Admin | Updated: December 5, 2014 14:39 IST2014-12-05T10:08:15+5:302014-12-05T14:39:32+5:30
जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी तीन विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात सात जवान शहीद झाले आहेत.

जम्मूत १२ तासांमध्ये तीन दहशतवादी हल्ले, सात जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर , दि. ५ - जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्याचे पाच जवान व पोलिसांचे दोन जवान असे सात जण शहीद झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून आणखी दोन दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. उरीपाठोपाठ सौरिया आणि शोपीया येथेही दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने जम्मू काश्मीरमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे.
उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपासून जवळ असलेल्या लष्करी तळावर शुक्रवारी सकाळी चौघा सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. या लष्करी कॅम्पमध्ये अन्य कॅम्पच्या तुलनेत फारशी सुरक्षा नसल्याने दहशतवाद्यांनी याच कॅम्पला टार्गेट केल्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून पहिल्या दोन टप्प्यात मतदारांनी भरघोस मतदान केले असून मतदारांमध्ये भिती निर्माण करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे दिसते. उरी येथे सैन्याचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. उरीतील सैन्याचे ऑपरेशन सुरु असताना सौरिया व शोपीया येथेही दहशतवादी हल्ला केला आहे.
श्रीनगरमधील सौरिया येथील हल्ला हा निवासी भागाजवळ झाल्याने सुरक्षा यंत्रणाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. तर शौरिया येथे दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्यावरच ग्रॅनेड हल्ला केला आहे.