Jammu-Kashmir: सध्या देशभरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी तर पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशातच, जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे भारतीय सैन्याने केलेल्या रेस्क्यू मिशनचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जवानांनी आपला जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या एका मुलाचा जीव वाचवला.
पुराच्या पाण्यात हेलिकॉप्टर उतरवले23 जुलै रोजी झालेल्या या रेस्क्यु ऑपरेशनचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नदीच्या मध्यभागी अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी लष्कराचे जवान हेलिकॉप्टरची मदत घेत असल्याचे दिसते. यादरम्यान ते चक्क पुराच्या पाण्यात हेलिकॉप्टर उतरवतात आणि मुलाला सुरक्षितरित्या बाहेर काढतात. भारतीय लष्कराचे कर्नल शौर्य सिंह आणि लेफ्टनंट कर्नल अभिजीत सिंह यांनी हे असाधारण धैर्य दाखवले.
हे कृत्य भारतीय सैन्याच्या निःस्वार्थ सेवेच्या आदर्शांचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठीच्या त्यांच्या अटळ वचनबद्धतेचे उदाहरण आहे. कर्नल शौर्य सिंग आणि लेफ्टनंट कर्नल अभिजित सिंग यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सशस्त्र दलांच्या परंपरा कायम ठेवल्या. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र भारतीय सैन्याचे कौतुक होत आहे.