जम्मू-काश्मिरात सत्ता स्थापनेचा पेच

By Admin | Updated: December 24, 2014 02:08 IST2014-12-24T02:08:47+5:302014-12-24T02:08:47+5:30

जम्मू-काश्मिरात दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारल्यानंतर भाजपात सरकार स्थापनेच्या दृष्टीने विचार मंथन सुरू झाले आहे़

JAMMU & KASHMIR POWERS | जम्मू-काश्मिरात सत्ता स्थापनेचा पेच

जम्मू-काश्मिरात सत्ता स्थापनेचा पेच

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारल्यानंतर भाजपात सरकार स्थापनेच्या दृष्टीने विचार मंथन सुरू झाले आहे़ याच पार्श्वभूमीवर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी) वा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्याच्या शक्यता न नाकारता,आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे़तर सर्वात जास्त जागा मिळविणाऱ्या पीडीपीने अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत.
जम्मू-काश्मीर निवडणुकांच्या ताज्या निकालानंतर पीडीपी विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे़, तर भाजपा दुसरा मोठा पक्ष ठरला आहे़ या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत बोलताना, जम्मू काश्मिरात आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे शहा म्हणाले़ जम्मू काश्मिरात भाजपा स्वत: सरकार बनवू शकते किंवा सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या पक्षाला पाठिंबाही देऊ शकते़ दुसऱ्या पक्षाच्या सरकारमध्ये सामील होण्याचा पर्यायही भाजपापुढे आहे़ हे तिन्ही पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे त्यांनी सांगितले़
झारखंडमधील नऊ
मंत्र्यांना पराभवाचा झटका
हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील नऊ दिग्गज मंत्र्यांनी पराभवाची धूळ चाखली. झारखंडचे अर्थमंत्री राजेंद्रप्रसाद सिंग(काँग्रेस) यांना बर्मो मतदारसंघात भाजपाचे योगेश्वर महातो यांनी १२,६१३ मतांनी पराभूत केले. जलसंसाधन मंत्री अन्नपूर्णादेवी(राजद) यांचा कोडर्मा मतदारसंघात भाजपाच्या नीरा यादव यांनी १३ हजारावर मतांनी पराभव केला. बांधकाममंत्री हाजी हुसेन अन्सारी(झामुमो) यांना मधुपूर मतदारसंघात भाजपाचे राज पालीवार यांनी ६ हजारावर मतांनी मात दिली. पर्यटन मंत्री सुरेश पासवान(राजद) यांचा भाजपाचे नारायण दास यांनी देवगडमध्ये ४५ हजारावर मतांनी पराभव केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: JAMMU & KASHMIR POWERS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.