Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. तसेच भारताने सिंधू नदीच्या पाणीवाटपावरून धोरणात्मक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यातच आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी तटस्थ चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पलटवार केला आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले. परंतु, पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेणे टाळले. पहलगाम हल्ल्याशी आमचा कोणताच संबंध नसल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले. मात्र, यातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देताना, पाकिस्तान या हल्ल्याप्रकरणी तटस्थ चौकशी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी यावरून पाकिस्तावर टीका केली आहे.
पहलगाम येथे झाले, ते व्हायला नको होते
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे पाकिस्तान मान्यच करायला तयार नव्हते. हा हल्ला हिंदुस्थानने केला, हीच त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. ज्या लोकांनी भारतावरच आरोप केले, त्यांच्याबाबत आता काय बोलणार? त्यांच्या विधानाबाबत मी काही जास्त बोलू इच्छित नाही. पहलगाम येथे झाले, ते व्हायला नको होते. त्या घटनेचे दुःखच आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच सिंधू जल करारामुळे आधीच जम्मू काश्मीरचे खूप नुकसान झाले आहे. आता यावर काही निर्णय होत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे, असेही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
काही असले तरी प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो
पर्यटकांच्या मनात प्रचंड भीतीची जी भावना तयार झाली आहे, ती नक्कीच समजू शकतो. सुट्टीचा आनंद अनुभवण्यासाठी जे इथे येतात, त्यांना असे तणावात टाकणे योग्य नाही. परंतु, पर्यटकांना एवढेच सांगू इच्छितो की, अशा परिस्थितीत काश्मीरला त्यांनी एकटे सोडले, तर भारताचे जे शत्रू आहे, त्यांचा हेतू साध्य होऊ शकतो. कारण, ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, त्यांचा हेतू हाच होता की, काश्मीरमधून सर्व पर्यटकांनी निघून जायला हवे. काही असले तरी प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. त्यामुळे पर्यटकांना आवाहन करतो की, परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
दरम्यान, भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला पहलगाम येथे दाखल झाले. हेलिकॉप्टर येथे उतरू शकत नव्हते. त्यामुळे तत्काळ येता आले नाही. आता पहलगाम येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे. तेथील स्थानिकांनी स्थलांतर होण्याबाबत विनंती केली होती. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यांच्यासाठी दुसरी योग्य जागा पाहून घरे बांधण्यास मदत करण्याबाबतच्या सूचना केली आहे. त्यांच्या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, हा विश्वास स्थानिकांना देतो, असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.