जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु
By Admin | Updated: January 17, 2016 14:12 IST2016-01-17T13:53:02+5:302016-01-17T14:12:47+5:30
. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीडीपीकडून सत्ता स्थापनेकडून कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे पीडीपी-भाजप आघाडीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १७ - जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीडीपीकडून सत्ता स्थापनेसंबंधी कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे पीडीपी-भाजप आघाडीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.
पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी दुपारी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. राज्यात विरोधी पक्षात असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी भाजपबरोबर आघाडी करुन सरकार स्थापनेची तयारी दर्शवली आहे.
या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. पीडीपी आणि भाजप दोघांपैकी कोणीही सत्तास्थापनेचा दावा न केल्यामुळे ९ जानेवारीपासून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
परस्पर विरोधी विचारधारेचे पक्ष असलेले पीडीपी आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्यानंतर १० महिन्यात दोन्ही पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरुन मतभेद झाले. जम्मू-काश्मीरच्या जनतेने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता त्रिशंकू कौल दिल्यामुळे पीडीपी आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी एकत्र यावे लागले.
८७ सदस्यांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीचे २७ आणि भाजपचे २५ आमदार आहेत. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे ७ जानेवारीला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले होते.