जेटली-राजनाथसिंह शीतयुद्धाचा भडका
By Admin | Updated: June 11, 2015 23:42 IST2015-06-11T23:42:48+5:302015-06-11T23:42:48+5:30
रालोआ सरकारमधील नंबर दोनचे मंत्री राजनाथसिंग आणि मोदींशी असलेल्या घनिष्ठतेमुळे नंबर दोन मानले जाणारे मंत्री अरुण जेटली यांच्यातील गेल्या काही

जेटली-राजनाथसिंह शीतयुद्धाचा भडका
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
रालोआ सरकारमधील नंबर दोनचे मंत्री राजनाथसिंग आणि मोदींशी असलेल्या घनिष्ठतेमुळे नंबर दोन मानले जाणारे मंत्री अरुण जेटली यांच्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धाला आता जाहीर कलहाचे रूप मिळाले आहे. सत्ता वर्तुळात आता या मुद्यावर चर्चा रंगू लागली आहे. त्याचे कारण आहे सन टीव्हीच्या परवान्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा.
अरुण जेटली यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खातेही असून त्यांनी गृहमंत्रालयाकडे सन टीव्हीच्या नूतनीकरणाला मंजुरी मागितली आहे. गेल्या महिन्यापासून याबाबत वाद चिघळत असताना मोदी यांनी अर्थपूर्ण मौन बाळगले आहे.
गृहमंत्रालयाने देशाच्या आर्थिक सुरक्षेचा मुद्दा समोर करीत सन टीव्हीच्या ३३ टीव्ही वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणाला मंजुरी नाकारली आहे. १० वर्षांची परवान्याची मुदत संपल्यामुळे सन टीव्ही समूहाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे दाखल केलेला अर्ज गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर आर्थिक सुरक्षा हा निकष ठेवत परवानगी नाकारली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव बिमल जुल्का यांनी ही बाब जेटली यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्रालयाकडे आर्थिक सुरक्षा म्हणजे काय, याबाबत स्पष्टीकरण मागितल्याने वादाला वेगळे वळण मिळाले.
माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांच्याकडे सन टीव्हीची मालकी आहे.