जेटलींनी रामदेवबाबांची तुलना महात्मा गांधींशी केली
By Admin | Updated: May 19, 2014 10:11 IST2014-05-19T10:07:29+5:302014-05-19T10:11:40+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी योगगुरु रामदेव बाबा यांची तुलना थेट महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्याशी केल्याने वाद निर्माण झाला आहे.
जेटलींनी रामदेवबाबांची तुलना महात्मा गांधींशी केली
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९ - भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटलींनी योगगुरु रामदेव बाबांची तुलना थेट महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्याशी केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने जेटलींच्या या विधानावर आक्षेप घेत पराभवामुळे जेटलींना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळेच जेटलींनी असे विधान केले असावे असा टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप व मोदींना समर्थन देणा-या रामदेवबाबांच्या समर्थकांनी रविवारी दिल्लीत संकल्पपूर्ती महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपचे अरुण जेटली, राजनाथ सिंह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात जेटलींनी रामदेव बाबांची तुलना थेट महात्मा गांधींशी केली. जेटली म्हणाले, मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाबा रामदेव यांनी केलेले प्रयत्न हे महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्यासारखेच होते. व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
भ्रष्टाचार, काळा पैशांसंदर्भात रामदेवबाबांने दिलेला लढा हा महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्या संघर्षाप्रमाणेच होता. महात्मा गांधीप्रमाणेच रामदेव बाबाही बहुमुखी आहेत. त्यांनी योग, आयुर्वेद, अर्थशास्त्र आणि राजकारण यात बदल घडवले अशी स्तुतीसुमनेही जेटलींनी उधळली. तर राजनाथ सिंह यांनीदेखील भाजपच्या विजयात रामदेव बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे सांगितले. दरम्यान, जेटलींच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे शकील अहमद यांनी ट्विटरद्वारे विरोध दर्शवला आहे.