जेटली डीडीसीएच्या चौकशीला का घाबरतात ? - केजरीवाल
By Admin | Updated: December 16, 2015 10:16 IST2015-12-16T10:16:20+5:302015-12-16T10:16:20+5:30
अरुण जेटली डीडीसीएच्या चौकशीला इतके का घाबरतात ? डीडीसीए घोटाळयात त्यांची काय भूमिका होती ? असे प्रश्न केजरीवालांनी विचारले आहेत.

जेटली डीडीसीएच्या चौकशीला का घाबरतात ? - केजरीवाल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - दिल्लीचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे. अरुण जेटली यांना वाचवण्यासाठी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.
अरुण जेटली डीडीसीएच्या चौकशीला इतके का घाबरतात ? डीडीसीए घोटाळयात त्यांची काय भूमिका होती ? असे प्रश्न केजरीवालांनी टि्वटरवरुन विचारले आहेत. बुधवारी सकाळी केलेल्या टि्वटसमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयचे अधिकारी माझ्या कार्यालायतील डीडीसीएच्या फाईल्स वाचत बसले होते असा दावा केला आहे.
माझ्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा आरोपांशी संबंध नसल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे. सीबीआयचे अधिकारी डीडीसीएच्या फाईल्स जप्त करु शकत होते. माझ्या पत्रकारपरिषदेनंतर ते निघून गेले. त्यांनी फाईल्सची प्रत सोबत नेली किंवा नाही ते अजून स्पष्ट नाही असे केजरीवालांनी म्हटले आहे.
छापे केजरीवालांच्या नव्हे तर त्यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर मारल्याचे सीबीआयने स्पष्ट केले असले तरी, कारवाई आपल्याला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आली असा दावा केजरीवालांनी केला आहे.