संथारावरील बंदीला जैन समाज आव्हान देणार
By Admin | Updated: August 13, 2015 08:47 IST2015-08-13T02:07:29+5:302015-08-13T08:47:03+5:30
राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा व्रत प्रथेवर घातलेल्या बंदीविरुद्ध लवकरच फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय अखिल भारतीय सकल जैन समाजाने घेतला आहे.

संथारावरील बंदीला जैन समाज आव्हान देणार
उदयपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा व्रत प्रथेवर घातलेल्या बंदीविरुद्ध लवकरच फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय अखिल भारतीय सकल जैन समाजाने घेतला आहे.
तेरापंथीय जैनसभाध्यक्ष राजकुमार फत्तावत यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यासंदर्भात मुंबईत एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीद्वारे ही फेरविचार याचिका दाखल केली जाईल आणि गरज पडल्यास या प्रकरणी समाज सर्वोच्च न्यायालयातही दाद मागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नामवंत जैनाचार्य राकेश मुनी यांनी संथारा प्रथेवर बंदीचा उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करताना सांगितले की, ही प्रथा केवळ जैन धर्मातच नाही, तर हिंदू धर्मातील ऋषीमुनींद्वारे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपेरचा भाग आहे. भारतीय दंड संहितेतही यावर बंदी आणणारा कुठला कायदा नाही. ही शरीर व आत्म्याच्या नूतनीकरणासाठीची साधना असून, निर्वाणाच्या मार्गावरील एक मान्य प्रक्रिया आहे. भादंविच्या कलम २९ आणि ३० मधील तरतुदीनुसार जाती, भाषा आणि संस्कृतीच्या आधारे अल्पसंख्याकांना आपला धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, याकडेही जैनाचार्य राकेश मुनी यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)