नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले होते. राधाकृष्णन यांनी आज देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारमंधील मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मात्र या उपस्थितांमध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर पहिल्याच दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तसेच या राजीनाम्याबाबत अनेक तर्कवितर्कही लढवले जात होते. तसेच राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड हे बरेच दिवस संपर्काबाहेर असल्याने त्यांच्याबाबत वेगवेगळे दावे केले जात होते.
मात्र आज सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या शपथविधीच्या निमित्ताने जगदीप धनखड हे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर आले. यावेळी ते इतर माजी उपराष्ट्रपती असलेल्या व्यंकय्या नायडू आणि हामिद अन्सारी यांच्याशेजारी बसले होते.
जगदीप धनखड यांनी २०२२ साली ऑगस्ट महिन्यात देशाचे उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र यावर्षी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर पहिल्याच दिवशी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देत धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.