काळा पैसा परत आणणे हे बिकट काम -शहा
By Admin | Updated: January 11, 2015 01:29 IST2015-01-11T01:29:22+5:302015-01-11T01:29:22+5:30
काळा पैसा परत आणण्यात अनेक अडचणी आहेत, ते फक्त भारताच्या हातात नाही. कारण अनेक आंतरराष्ट्रीय करार त्यात आडवे येत आहेत.

काळा पैसा परत आणणे हे बिकट काम -शहा
नवी दिल्ली : परदेशातील काळा पैसा परत आणणे हे काम आंतरराष्ट्रीय करारांपायी बिकट असल्याचे मत व्यक्त करून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यावर आंतरराष्ट्रीय करारांविषयी तोडगा निघाल्यानंतरच आरोपींना योग्य ती शिक्षा केली जाऊ शकते, अशी भूमिका घेतली आहे. काळा पैसा परत आणण्याच्या निवडणूकपूर्व गर्जना म्हणजे भाजपाने मतदारांची केलेली दिशाभूल होती, या विरोधकांच्या टीकास्त्राच्या पार्श्वभूमीवर शहा यांचे वक्तव्य लक्षणीय आहे.
संसदेत महत्त्वपूर्ण विधेयके संमत होऊ न देण्याबाबत विरोधी पक्षावर शरसंधान साधताना त्यांनी देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर होऊ न देण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही बजावले. रामलीला मैदानावर आयोजित रॅलीत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात काळ्या पैशाच्या मुद्द्यावर एक वातावरण तयार केले आहे. त्या समस्येवर तोडगा काढण्याकरिता अनेक देश सहमतही झाले आहेत. आंतरराष्ट्रीय करारांबाबत काही तोडगा निघाल्यास भाजपा या गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात यशस्वी होईल, असे प्रतिपादन शहा यांनी पुढे केले. भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत काळ्या पैशांबाबत एका समितीची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम
आदमी पार्टीवर हल्ला चढविताना या पक्षाने खोटे बोलण्याचा विक्रम केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काळा पैसा परत आणण्यात अनेक अडचणी आहेत, ते फक्त भारताच्या हातात नाही. कारण अनेक आंतरराष्ट्रीय करार त्यात आडवे येत आहेत.
- अमित शहा, अध्यक्ष, भाजपा