सगळं चांगलं झालं ना - भावी पंतप्रधान मोदींनी केली मराठीत विचारपूस
By Admin | Updated: May 16, 2014 19:00 IST2014-05-16T19:00:07+5:302014-05-16T19:00:07+5:30
सगळं चांगलं झालं ना, मजा आली ना, आता चलायचं ना असं चक्क मराठीत बोलत भारताचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या विजयी सार्वजनिक सभेची सांगता गुजरातमध्ये केली.

सगळं चांगलं झालं ना - भावी पंतप्रधान मोदींनी केली मराठीत विचारपूस
वडोदरा, दि. १६ - सगळं चांगलं झालं ना, मजा आली ना, आता चलायचं ना असं चक्क मराठीत बोलत भारताचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या विजयी सार्वजनिक सभेची सांगता गुजरातमध्ये केली.
स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी मतफरकाने निवडून दिल्याबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी गुजराती व मराठीतून भाषणाची विनंती केली. त्यावेळी तुम्हीच मला पंतप्रधान केलेत असे सांगत हिंदीतून भाषण केलेल्या मोदींनी शेवट मात्र मराठी व गुजरातीतून करत तमाम पाठिराख्यांना खूश केले.
मी मजदूर नंबर एक असल्याचे सांगत निवडणुकीच्या प्रचारात मी केलेली मेहनत तुम्ही बघितलीच आहे असे ते म्हणाले. अशीच मेहनत पुढील ६० महिने आपण करू याची ग्वाही मोदींनी दिली. गेल्या १४ वर्षांमध्ये एकही सुट्टी न घेणारे मोदी यापुढेही अशीच मेहनत घेतील असा विश्वास बाळगा असे ते म्हणाले.
संपूर्ण बहुमत मिळाले असले तरी सबका साथ सबका विकास हाच आपला कामाचा मूलमंत्र राहील असे त्यांनी सांगितले. सर्वसमावेशक विकासावरच आपला भर राहील असे ते म्हणाले.
आत्तापर्यंतचे सगळे पंतप्रधान हे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आले होते, याचा दाखला देत, स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेला मी पहिला पंतप्रधान आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. आम्हाला देशाच्या स्वराज्यासाठी लढण्याची, मरण्याची संधी मिळाली नाही, मात्र सुराज्यासाठी जगण्याचे सौभाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.