Breaking News:कर चुकवेगिरी करणाऱ्या भाजप एका माजी आमदाराच्या घरावर आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली. मध्य प्रदेशातील सागर येथे असलेल्या माजी आमदार हरवंश सिंह राठोड यांच्या घरावर धाड टाकण्यात आली होती. राठोड यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या माजी नगरसेवक राजेश केशरवानी यांच्याही घराची झाडाझडती घेण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार हरवंश सिंह राठोड यांनी १५५ कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे तपासातून समोर आले आहे. आयकर पथकाने त्यांच्या घरातून तब्बल ३ कोटी रुपये रोख रक्कम आणि कोट्यवधी रुपये किंमत असलेले सोने आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
केशरवानी हा माजी आमदार राठोड यांच्यासोबत विडी तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी १४० कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे. राठोड हे बांधकाम व्यावसायिकही आहेत.
घरात सापडल्या तीन मगरी
अधिकाऱ्यांनी घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर जाळ्या बसवलेल्या ठिकाणी पाहणी केली, त्यावेळी त्यांना तिथे तीन जिवंत मगरी दिसल्या. मगरी बघून अधिकाऱ्यांना घामच फुटला. अधिकाऱ्यांनी तातडीने वनविभागाला संपर्क करून याची माहिती दिली.
केरशवानी यांच्या घरातही अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या बेनामी परदेशातून आयात केलेल्या कार आढळल्या आहेत. या कारची नोंदणी केशरवानी यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे नाहीत. या कारबद्दल आता आयकर विभागाने केशरवानी यांना माहिती सादर करण्यास सांगितले आहे.
राठोड यांचे वडील होते मंत्री
राठोड हे सागर जिल्ह्यातील उद्योजकही आहेत आणि ते भाजपचे माजी आमदार होते. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते निवडून आले होते. त्याचबरोबर भाजपच्या जिल्हाप्रमुख पदासाठी ते प्रबळ दावेदार होते. त्यांचे वडील हरनाम सिंह राठोड हे मध्य प्रदेशचे मंत्री राहिलेले आहेत.