अंतराळ यानाचा फेरवापर शक्य?
By Admin | Updated: June 16, 2015 02:27 IST2015-06-16T02:27:55+5:302015-06-16T02:27:55+5:30
सर्वाधिक कमी खर्चात मंगळ मोहीम यशस्वी करून अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात जगभरात आपला ठसा उमटविणाऱ्या भारतीय अंतराळ

अंतराळ यानाचा फेरवापर शक्य?
नवी दिल्ली : सर्वाधिक कमी खर्चात मंगळ मोहीम यशस्वी करून अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात जगभरात आपला ठसा उमटविणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आता समुद्रात कोसळणारे अंतराळ यान पुन्हा प्रक्षेपणासाठी वापरता येईल असे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असून याची पहिली चाचणी पुढील महिन्यात होणार आहे.
इस्रोकडून यावर्षी सप्टेंबरपर्यत अंतराळ विज्ञानासाठी समर्पित भारताचा पहिला उपग्रह ‘अॅस्ट्रोसेट’चेही प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी अंतराळ विभागाच्या वर्षभराच्या कारकीर्दीचा लेखाजोखा सादर करण्यासाठी सोमवारी पत्रपरिषद आयोजित केली होती. त्याप्रसंगी उपरोक्त माहिती देण्यात आली. अंतराळ यान फेरवापराच्या या तंत्रज्ञानामुळे इस्रोचा प्रक्षेपण मोहिमेवरील खर्च ९० टक्के कमी करता येईल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंगळ मोहिमेच्या यशामुळे अंतराळ क्षेत्रात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे याकडे लक्ष वेधताना सिंग म्हणाले, पुढील वर्षी इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टम (आयआरएनएसएस) शृंखलेतील दोन उपग्रहांचे आणि त्यानंतरच्या वर्षी तीन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अंतराळ विभागातर्फे गेल्या वर्षभरात ११ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)