‘ते’ हस्ताक्षर गजेंद्रचे नाहीच; कुटुंबाचा दावा
By Admin | Updated: April 23, 2015 23:46 IST2015-04-23T23:46:44+5:302015-04-23T23:46:44+5:30
आपच्या रॅलीत आत्महत्या करणारा शेतकरी गजेंद्रसिंग रावत याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रातील हस्ताक्षर त्याचे नसल्याचा दावा कुटुंबियांनी केल्यामुळे

‘ते’ हस्ताक्षर गजेंद्रचे नाहीच; कुटुंबाचा दावा
नवी दिल्ली/दौसा : आपच्या रॅलीत आत्महत्या करणारा शेतकरी गजेंद्रसिंग रावत याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रातील हस्ताक्षर त्याचे नसल्याचा दावा कुटुंबियांनी केल्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी हे पत्र तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहे.
दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही या आत्महत्येसाठी आप नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. आप नेत्यांनीच गजेंद्रसिंगला आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्याच्या बचावासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमध्ये सर्व प्रकारचे अडथळे निर्माण केले, असा पोलिसांचा आरोप आहे.
गजेंद्रसिंगच्या पार्थिवावर गुरुवारी दौसा जिल्ह्यातील नांगल झमरवाडा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस व आप कार्यकर्त्यांनी वेळीच दखल घेतली असती तर गजेंद्रसिंगचा मृत्यू टळला असता असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
पिकाच्या नुकसानामुळे गजेंद्रसिंग चिंतेत असला तरी आत्महत्या करण्याची त्याची मानसिकता नव्हती. रॅलीतीलच काही लोकांनी त्याला यासाठी उद्युक्त केले असण्याची शक्यता गजेंद्रसिंग यांचे मेहुणे सुरेंद्रसिंग यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गजेंद्रसिंग याची पार्श्वभूमी, दिल्लीत येण्यामागील कारण आदी माहिती मिळविण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस पथक दौसाच्या नांगल झमरवाडा गावात पाठविण्यात आले आहे. याशिवाय त्याच्या मोबाईल रेकॉर्डची तपासणी सुरू आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांना अहवाल सादर केला असून गुन्हे शाखेचे तपास पथक गजेंद्रसिंगच्या गावी रवाना झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), १८६ (सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणणे) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.