नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत सर्व खासदारांनी आंबेडकरांचा फोटो हातात घेत संसद भवनात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या मुद्द्यावरून विरोधकांनी अमित शाह यांना घेरले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटलंय की, एका पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा संपवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला. संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे आणि एससी एसटी समुहाकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला. शाह यांनी दिलेल्या तथ्यामुळे काँग्रेसची बोलती बंद झाली. त्यामुळेच आज ते नौटंकी करत आहेत. हे दु:खद असले तरी लोकांना सत्य माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आज आम्ही जे काही आहोत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहोत. आमच्या सरकारने मागील एका दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही न थांबता मेहनत घेतली आहे. कुठलेही क्षेत्र घ्या, मग २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे असेल, एससी, एसटी कायदा मजबूत करणे असेल. आमच्या सरकारने स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना यासारखे अनेक कार्यक्रम केले. या सर्व योजनांमुळे गरीब आणि वंचित घटकांना न्याय दिला आहे असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
दरम्यान, काँग्रेसने एकदा नव्हे दोनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला. पंडित नेहरू यांनी त्यांच्याविरोधात प्रचार करत आंबेडकरांचा पराभव प्रतिष्ठेचा केला होता. काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्नही देण्यास नकार दिला होता. त्यांचा फोटो संसदेत सन्मानाने लावण्यासही काँग्रेसची इच्छा नव्हती. जर काँग्रेसला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटत असेल की त्यांची चुकीची कामे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान लपवू शकतात तर ही त्यांची मोठी चूक आहे. घराणेशाहीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि एससी, एसटी समुहाचा अपमान करण्याचा त्यांनी खूपदा प्रयत्न केला हे भारतातील जनतेने अनेकदा पाहिले आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.