बेपत्ता विमानातील कोणी जिवंत असणे अशक्य
By Admin | Updated: August 13, 2016 02:33 IST2016-08-13T02:33:33+5:302016-08-13T02:33:33+5:30
बंगालच्या खाडीत मागील महिन्यात बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानातील कोणी जिवंत राहिले असल्याची शक्यता कमी असली तरी शोधकार्य थांबवण्यात येणार नाही

बेपत्ता विमानातील कोणी जिवंत असणे अशक्य
नवी दिल्ली : बंगालच्या खाडीत मागील महिन्यात बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानातील कोणी जिवंत राहिले असल्याची शक्यता कमी असली तरी शोधकार्य थांबवण्यात येणार नाही, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी सांगितले की, एका आठवड्यात तीन वेळा कुरिअर घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे हे विमान २२ जुलै रोजी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरकडे जात होते. तामिळनाडूच्या ताम्बरम येथून अंदमानसाठी सकाळी साडेआठ वाजता उड्डाण केल्यानंतर एका तासाच्या आत रडारवरून ते बेपत्ता झाले होते. विमानात चालक दलाचे सहा सदस्य होते व हवाई दलाचे २३ कर्मचारी होते. त्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली. परंतु माहिती हाती लागलेली नाही. विमानातील कोणाचीही जिवंत राहिले असण्याची शक्यता कमी आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)