ISRO Income: केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ISRO बाबत मोठा खुलासा केला आहे. जितेंद्र सिंह म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत इस्रोने युरोप आणि अमेरिकेच्या अंतराळ मोहिमांद्वारे सुमारे 427 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे 3600 कोटी रुपये होते.
राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी (31 डिसेंबर 2024) सांगितले की, इस्रोने गेल्या दहा वर्षात अमेरिका आणि युरोपियन युनियनसाठी व्यावसायिक उपग्रहांच्या प्रक्षेपणातून $427 मिलियनपेक्षा जास्तची कमाई केली आहे. त्यांनी आगामी काळात महसुलाचे आकडे वाढण्याची शक्यता वर्तवली. तसेच, इस्रो 2025 च्या पहिल्या सहामाहीत पाच व्यावसायिक प्रक्षेपण करणार असल्याची माहिती दिली.
आतापर्यंत एवढी कमाई झाली आतापर्यंत इस्रोने अमेरिकेसाठी उपग्रह प्रक्षेपित करून $172 मिलियन कमावले, तर युरोपियन युनियनकडून $304 मिलियनची कमाई केली. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षात US प्रक्षेपणातून $157 आणि EU प्रक्षेपणातून $271 मिलियनची कमाई झाली आहे. हे भारताने अंतराळ अर्थव्यवस्थेत केलेली प्रगती आणि एक अग्रगण्य अंतराळ राष्ट्र म्हणून त्याची प्रतिष्ठा दर्शवते. आगामी काळात अशा आणखी मोहीमा राबवण्यात येणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.