भारतातही इसिस?
By Admin | Updated: March 8, 2017 05:59 IST2017-03-08T05:59:00+5:302017-03-08T05:59:00+5:30
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा उद्या, बुधवारी पार पडणार असतानाच, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या

भारतातही इसिस?
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा उद्या, बुधवारी पार पडणार असतानाच, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, मंगळवारी भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटांत त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय सैफुल्ला नावाच्या संशयित अतिरेक्यासह दोघेजण लखनौच्या ठाकुरगंज भागातील एका घरात लपून बसले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती.
सैफुल्लाला जिवंत पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास, या दहशतवादी गटाच्या या आधीच्या, तसेच भविष्यातील कारवायांची माहिती मिळू शकेल. गेल्या वर्षी कानपूर येथे झालेला रेल्वे अपघातही घातपाताचाच प्रकार आहे, असे पोलिसांना वाटत आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारात भोपाळहून उज्जैनला जाणाऱ्या रेल्वेमध्ये जबडीत स्टेशनजवळ आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. त्यात दहा जण जखमी झाले असून, त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर काही तासांनी पोलिसांनी इटावा येथून एकाला आणि कानपूरहून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचे आयएसशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच सैफुल्लाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. (वृत्तसंस्था)
दहशतवाद्याला पकडण्यासाठी ‘आॅपरेशन’
लखनौमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर सैफुल्लाने गोळीबार केला. तो एका घरात दडून बसला असून, त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का, हे समजू शकलेले नाही. मात्र, तो गजबजलेला आणि दाटीवाटीच्या वस्तीचा भाग असून, दहशतवादीविरोधी पथकाचे पोलीस घराघरांत शिरून त्याचा शोध घेत आहेत. तो ज्या ठिकाणी लपून बसल्याचा कयास आहे, तिथे बाहेरून पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडेही फोडले.
सैफुल्ला मधूनमधून आतून गोळीबार करीत असून, त्याच्याकडे अत्याधुनिक शस्त्र असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आम्ही पोहोचण्यापूर्वीच तो घरात शिरून लपला. त्याला जिवंत बाहेर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही चिली बॉम्बचा वापर करून त्याला बाहेर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, तसेच या संपूर्ण भागातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे, असे उत्तर प्रदेशच्या एटीएसचे प्रमुख असिम अरुण यांनी सांगितले. अन्य जिल्ह्यातही तपास मोहीम सुरू आहे.
शरण येण्यास नकार
सैफुल्लाने शरण येण्यास नकार दिला आहे. प्रसंगी मी शहीद होईन, पण तुमच्यापुढे शरणागती पत्करणार
नाही, असे सैफुल्लाने सांगितल्याची माहिती पोलिसांनी सांगितले. तो एका धर्मगुरूच्या घरात लपून बसला आहे.
बॉम्ब नेमका ठेवला कुणी?
या सर्र्वाचा रेल्वे बॉम्बस्फोटांशी संबंध असला, तरी प्रत्यक्ष बॉम्ब त्यांनी नव्हे, तर इतर कोणी तरी ठेवला असावा, असा अंदाज आहे. उज्जैनहून कानपूर व लखनौ हे अंतर किमान १0 तासांचे असून, बॉम्ब ठेवून त्यांना तिथपर्यंत पळून जाणे शक्यच नाही, असे पोलिसांनी सांगितले.