ईशरत जहाँ प्रकरण - वंजारा म्हणतात अच्छे दिन आ गये
By Admin | Updated: February 18, 2015 15:41 IST2015-02-18T15:41:33+5:302015-02-18T15:41:33+5:30
गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा जामिनावर सुटले असून आपल्यासाठी अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया त्यांनी बाहेर आल्यावर व्यक्त केली आहे.

ईशरत जहाँ प्रकरण - वंजारा म्हणतात अच्छे दिन आ गये
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १८ - इशरत जहाँ आणि सोहराबुद्दिन शेख यांच्या बनावट चकमक प्ररणातील आरोपी व गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा जामिनावर सुटले असून आपल्यासाठी अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया त्यांनी बाहेर आल्यावर व्यक्त केली आहे. माझ्यासाठी व गुजरात पोलीसांसाठी अच्छे दिन नक्कीच आले आहेत असे वंजारा साबरमती जेलमधून बाहेर आल्यावर म्हणाले. या प्रकरणात वंजारा साडेसात वर्षे तुरुंगात होते.
राजकीय कारणांसाठी गुजरात पोलीसांना लक्ष्य करण्यात आल्याची टीका वंजारा यांनी केली आहे. प्रत्येक राज्याचे पोलीस दहशतवादाविरोधात लढत असतात. परंतु केंद्राच्या आधीच्या सरकारने गुजरात पोलिसांना एखाद दिवस नाही तर तब्बल आठ वर्षे सतावले असल्याचे वंजारा म्हणाले. वंजारा यांचे तुरुंगाबाहेर हजारो समर्थकांनी स्वागत केले. वंजारा यांना ३ फेब्रुवारी रोजी स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अर्थात वंजारा यांना गुजरातमध्ये राहता येणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी वंजारा यांना सोहराबुद्दिन शेख व तुलसी प्रजापती यांच्या बनावट चकमकीप्रकरणीही मुंबईतील न्यायालयाने जामीन दिला आहे. वंजारांना २४ एप्रिल २००७ रोजी सीआयडीने अटक केली होती.