इशरत जहाँ प्रकरण - डी जी वंजारा यांना गुजरातमध्ये येण्यास न्यायालयाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 17:01 IST2016-04-02T17:01:00+5:302016-04-02T17:01:00+5:30
इशरत जहाँ आणि सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी आरोपी असलेले गुजरातचे निवृत्त आयपीएस अधिकारी डी जी वंजारा यांना गुजरातमध्ये परत येण्यास न्यायालयाने परवानगी दिली आ

इशरत जहाँ प्रकरण - डी जी वंजारा यांना गुजरातमध्ये येण्यास न्यायालयाची परवानगी
>ऑनलाइन लोकमत -
अहमदाबाद, दि. २ - इशरत जहाँ आणि सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी आरोपी असलेले गुजरातचे निवृत्त आयपीएस अधिकारी डी जी वंजारा यांना गुजरातमध्ये परत येण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. डी जी वंजारा गेल्या वर्षभरापासून मुंबईत असून त्यांच्या जामीन अर्जात गुजरातमध्ये प्रवेश न करण्याची अट घालण्यात आली होती. न्यायालयाने ही अट शिथील करत डी जी वंजारा यांना दिलासा दिला आहे.
काही दिवसांपुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने डी जी वंजारा यांना सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी मुंबईबाहेर प्रवास करण्याची परवानगी दिली होती. मुंबईत माझ्या जीवाला धोका असल्याचं डी जी वंजारा यांनी न्यायालयात सांगितलं होतं. मुंबईत अनेक गुन्हेगारांचं वास्तव्य असल्याने जीवाला धोका असल्याचं डी जी वंजारा यांनी म्हंटलं होतं.
वंजारा यांनी सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी साक्षीदार असलेल्या दोघांना आरोपी बनवण्याची मागणी केली होती ती न्यायालयाने फेटाळली आहे. सोहराबुद्दीन शेखची 26 नोव्हेंबर 2005ला पोलीस कोठडीत हत्या झाली होती. गुजरातमधील न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. तसंच याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची मुंबई सत्र न्यायालयाने डिसेंबर 2014मध्ये सुटका केली होती.