‘इसिस’चे प्राचारी ट्विट्स बंगळुरुमधून?
By Admin | Updated: December 13, 2014 12:12 IST2014-12-13T01:45:11+5:302014-12-13T12:12:13+5:30
‘इसिस’चे सर्वात यशस्वी ट्विटर अकाऊंट हाताळणारा बेंगळुरूचा मेहदी नावाचा इसम फरार झाल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे.

‘इसिस’चे प्राचारी ट्विट्स बंगळुरुमधून?
ब्रिटिश वृत्तवाहिनी : मेहदी नावाच्या इसमाचा शोध सुरु
बेंगळुरू @ShamiWitness या नावाने ‘इसिस’चे सर्वात यशस्वी ट्विटर अकाऊंट हाताळणारा बेंगळुरूचा मेहदी नावाचा इसम फरार झाल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे. हे ट्विटर अकाऊंट हाताळणारा इसम बेंगळुरूत राहात असल्याच्या ब्रिटिश मीडियाच्या वृत्ताचा गुन्हे शाखेमार्फत तपास प्रारंभ करण्यात आला आहे.
‘शुक्रवारी सकाळीच आम्हाला याबाबत माहिती मिळाली. या वृत्ताची सत्यासत्यता तपासण्याचे गुन्हे शाखेला सांगण्यात आले आहे. जसे तुम्हाला कळले तसेच मलाही कळले आहे. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल,’ असे शहर पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले.
या संदर्भात आपण एनआयए आणि आयबी या केंद्रीय संस्थांच्या संपर्कात असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. ‘इसिस’चे ट्विटर अकाऊंट हाताळणारा इसम बेंगळुरूतील एका बहुराष्ट्रीय जाहिरात कंपनीत कार्यकारी अधिकारी आहे आणि तो मेहदी या नावाने ओळखला जातो. या ट्विटरचे 17,700 समर्थक आहेत, असे वृत्त ‘चॅनल 4’ या ब्रिटिश वृत्तवाहिनीने दिले आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर @ShamiWitness हे अकाऊंट बंद करण्यात आले आहे.
‘इसिस’चे अकाऊंट हाताळणारा मेहदी बेंगळुरूतून फरार झाला आहे आणि सायबर सेल त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती एका पोलीस अधिका:याने दिली. हे ट्विटर अकाऊंट गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले होते आणि त्यावर इसिसची माहिती व सिरिया व इराकमधील हल्ल्यांची छायाचित्रे पोस्ट करून युवकांना इसिसमध्ये भरतीचे आवाहन केले जात होते, असे ‘चॅनल 4’ने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)