काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले. तसेच बोगस मतदारांबाबत मोठा दावा केला. राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलं असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी यासंदर्भात आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलं. तसेच त्याचा EPIC क्रमांक FPP6437040 असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या इपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार असल्याचा दावा केला. त्याबरोबरच राहुल गांधी यांनी त्या व्यक्तीचं छायाचित्र आणि इपिक क्रमांकाही दाखवला होता. राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानंतर आदित्य श्रीवास्तव या मतदाराची सत्यता पडताळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आदित्य श्रीवास्तव याच्या इपिक क्रमांकासह इलेक्टोरल रोलची पडताळणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तसेच यासाठी राहुल गांधी यांनी दाखवलेल्या इपिक क्रमांकासह शोध घेण्यात आला.
या पडताळणीमध्ये राहुल गांधी यांनी सांगितलेल्या इपिक क्रमांकावर आदित्य श्रीवास्तव नावाचा मतदार हा कर्नाटकच्या मतदार यादीत असल्याचे समोर आले. मात्र त्याच इपिक क्रमांकासह आदित्य श्रीवास्तव याचा शोध महाराष्ट्राच्या मतदार यादीत घेतला असता तिथे नो रिझल्ट फाऊंड असं उत्तर मिळालं.
तर उत्तर प्रदेशमध्येही शोध घेतला असता तिथेही नो रिझल्ट फाऊंड असं उत्तर समोर आलं. त्यामुळे राहुल गांधी यांनी सांगितलेल्या एपिक क्रमांकासह आदित्य श्रीवास्तव हा केवळ कर्नाकटमध्येच मतदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्याच्या उलट निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वेगळी माहिती मिळाली.