पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाने भीषण रूप धारण केले असून, या युद्धाच्या आगीत अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक देशांनी आपले एअरस्पेस बंद केल्यामुळे भारतीयांना मायदेशी आणण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर होते. मात्र, भारताने अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांच्या मदतीने एक नवा सुरक्षित मार्ग शोधून काढला असून, गुरुवारी ८८० भारतीय नागरिक सुखरूप भारतात परतले आहेत.
अर्मेनिया-अझरबैजान मार्ग ठरला देवदूत
मिडल इस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे थेट विमान प्रवास अशक्य झाला आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांच्या भूमार्गाचा आणि विमानतळांचा वापर करून भारतीयांना बाहेर काढले आहे. गुरुवारी परतलेल्या ८८० जणांपैकी ७७२ नागरिक अर्मेनियाच्या मार्गाने, तर ११० जण अझरबैजानमार्गे भारतात पोहोचले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि कामगारांचा समावेश आहे. तसेच, अडकलेल्या २८४ तीर्थयांपैकी जवळपास सर्वच जण आता सुरक्षितपणे मायदेशी परतले आहेत.
इराणमध्ये अजूनही ९ हजार भारतीय; दूतावास सतर्क
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीतही सुमारे ९ हजार भारतीय नागरिक अजूनही इराणमध्ये आहेत. या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी २४x७ हेल्पलाइन आणि कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. "आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. टप्प्याटप्प्याने प्रत्येक भारतीयाला सुरक्षित बाहेर काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे," असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सरकारचे नागरिकांना आवाहन
युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे, त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. अशा वेळी कोणत्याही नागरिकाने स्वतःहून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. सीमा ओलांडण्यापूर्वी किंवा प्रवासाचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक भारतीय दूतावासाशी संपर्क साधणे अनिवार्य करण्यात आले आहे.
युद्धाचा भडका आणि भारताची भूमिका
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे खाडी देशांतील वातावरण तणावपूर्ण आहे. आपल्या नागरिकांच्या केसालाही धक्का लागू नये, यासाठी भारतीय दूतावास सातत्याने अॅडव्हायझरी जारी करत आहे. अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, सरकारकडून सुरू असलेल्या वेगवान हालचालींमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Web Summary : Amid Iran-Israel tensions and airspace closures, India safely evacuated 880 citizens via Armenia and Azerbaijan. Thousands remain in Iran, with the embassy providing support. Citizens are urged to contact the embassy before traveling.
Web Summary : ईरान-इजराइल तनाव और हवाई क्षेत्र बंद होने के बीच, भारत ने आर्मेनिया और अज़रबैजान के माध्यम से 880 नागरिकों को सुरक्षित निकाला। हजारों अभी भी ईरान में हैं, दूतावास सहायता प्रदान कर रहा है। नागरिकों से यात्रा से पहले दूतावास से संपर्क करने का आग्रह किया गया है।