पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:09 AM2019-12-31T02:09:49+5:302019-12-31T02:10:06+5:30

उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी आंदोलकांवर झाली होती कारवाई

Investigate police action in court; The demand for Priyanka Gandhi | पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी

पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी

Next

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्या व उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना सोमवारी सादर केले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांना भरपाईसाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. या आंदोलकांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून त्या रकमेतून भरपाई वसूल केली जाईल. या नोटीसांना स्थगिती द्यावी अशी मागणीही काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.

आंदोलनात मृत, जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करा -राहुल गांधी
देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना ठार किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

पीडित कुटुंबियांची घेतली भेट
आसाममधील निदर्शनांमध्ये बळी गेलेल्यांपैकी दोन जणांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी शनिवारी भेट घेतली होती. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना देशभरात अनेक युवक व युवती ठार किंवा जखमी झाले आहेत.

त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना शक्य ती सर्व मदत काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावी. या आवाहनासोबतच राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांचा एक व्हिडिओ टिष्ट्वटरवर झळकविला आहे.

राहुल गांधी यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही उत्तर प्रदेशातील आंदोलनात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करत आहेत.

Web Title: Investigate police action in court; The demand for Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.