मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यातील बिरसा मुंडा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रसुतीगृहामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक गर्भवती प्रसुती वेदनांनी कळवळत असताना असतानाच महिला इंटर्न डॉक्टरमध्ये वाद झाला. त्यादरम्यान, त्यातील दोघींनी तिसरीला मारहाण केली. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका महिलेला प्रसुतीसाठी प्रसुतीगृहात आणलेलं दिसत आहे. त्याचदरम्यान, दोन तरुणी ड्युटीवर असलेल्या महिला इंटर्न डॉक्टर शिवानी लारिया हिला मारहाण करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर वादात मध्ये पडणाऱ्या एका पुरुष डॉक्टरलाही धमकावताना दिसत आहेत.
मारहाण झालेली शिवानी लारिया आणि मारहाण करणाऱ्या योगिता त्यागी आणि शानू अग्रवाल हे तिघेही मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टर आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून नाईट ड्युटीवरूव त्यांच्यामध्ये वादावादी सुरू होती. अखेरीस हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले.
दरम्यान, पीडित इंटर्न डॉक्टर शिवानी लारिया हिने सांगितले की, मी ११ सप्टेंबर रोजी माझ्या नियमित ड्युटीवर उपस्थित होते. तेव्हा रात्री ९.३० वाजता दोन्ही इंटर्न डॉक्टर तिथे पोहोचल्या आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, एक गर्भवती तिथेच बेडवर होती.